पुणे | शिल्लकसेना करार दाखवा नाहीतर महाराष्ट्राची माफी मागा, शंभर खोके बारामती ओके, वसुलीबाज 100 खोके मातोश्री ओके, शर्म करो शर्म करो महाविकास आघाडी शर्म करो, गल्ली गल्ली मे शोर है, ठाकरे – पवार चोर है अशा घोषणा देत मावळ तालुका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वडगाव येथे महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन केले.
मावळ तालुक्यात नियोजित असलेल्या वेदांता फॉक्सकॉन कंपनीचे गुजरातमध्ये स्थलांतर झाले. याला जबाबदार महाविकास आघाडी सरकार असून तत्कालीन आघाडी सरकारने जनतेची दिशाभूल केली असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. तत्कालीन राज्य सरकारच्या विरोधात मावळ भाजपा, शिंदे गट व आरपीआय यांच्यावतीने सोमवारी 26 सप्टेंबर रोजी वडगावमधील पोटोबा मंदिर ते पंचायत समिती या दरम्यान निषेध मोर्चा काढण्यात आला.
याबाबत बोलताना माजी आमदार बाळा भेगडे म्हणाले, गेल्या अडीच वर्षांमध्ये वेदांता फॉक्स्कॉन कंपनीने आघाडी सरकारकडे अनेकदा मागणी केली होती. मात्र सरकारने कोणतीही जागा दिली नाही. कंपनीने जागा ताब्यात घेतली नाही. सरकारने कोणात्याही शेतकऱ्याला मोबदला दिला नाही. जर सरकारने करार केला असेल तर तो ठाकरेंनी दाखवावा नाहीतर महाराष्ट्राची माफी मागावी.