बारामती | खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत. तालुक्यातील विविध गावांना आज भेटी देऊन सुप्रिया सुळे या आढावा घेत आहेत. दरम्यान तालुक्यातील एका गावात खासदार सुप्रिया सुळे यांचा आढावा सुरू असताना चक्क सुळे यांच्यासमोरच गावकरी आपापसात भिडल्याची दिसून आले. सुळे यांनी आपल्या कुटुंबातील उदाहरण देत, यावेळी वादावर पडदा टाकला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी.. यांच्या लग्नाला ३५ वर्षे झाली. मात्र चकली किंवा लाडू वळत असताना माझी आई किंवा आशा काकू म्हणत असतात, तेल गरम आहे का नाही? तर चकली खराब होईल. लाडू नीट वळा… असे काही ना काही सतत म्हणत असतात. दिसत नसलं तरी चष्मा घालून सासवा म्हटलं की चिंग चिंग करतच राहतात. चांगल्या गोष्टीसाठीच हे बोलणे असते असे म्हणत रस्त्याच्या कारणावरून झालेल्या वादावर सुळे यांनी कुटुंबातील उदाहरण देत जागेवरच तोडगा काढला.
बारामती तालुक्यातील डोरलेवाडी येथे सुळे यांचा नियोजित दौरा होता. सुळे या गावकऱ्यांची संवाद साधत असताना. गावातील रस्त्याच्या कारणावरून गावकऱ्यांच्या दोन गटात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. चांगल्या कामासाठी आपापसात तुम्ही भांडलात ही चांगली गोष्ट आहे. तुमचं कोणी ऐकत नसेल तर अकांड तांडव करणे योग्य आहे. मात्र आम्ही ऐकायला तयार असताना असा वाद करणे योग्य नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी गावकऱ्यांचे कान टोचले.