सिंधुदुर्ग | शाळेत महापुरूषांचे फोटो लावले पाहिजेत. त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. भुजबळांच्या या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भुजबळांच्या या विधानावरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलीय. भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी भुजबळांच्या विधानावरुन त्यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केलीय. निलेश राणेंनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिलंय, ”नोटांवर पण फक्त गांधीजी कशाला, सगळे महापुरुष पाहिजे. हिंदू धर्मामध्ये पारंपरिक श्रद्धेला वेगळं महत्त्व आहे. पण, ते पवार साहेबांच्या सोबत असणाऱ्यांना समजणार नाही. हे वाक्य ओवैसी बोलण्यासारखं आहे,” अशी टीका राणेंनी भुजबळांवर केलीय.
चित्रा वाघ यांनीही भुजबळांवर निशाणा साधलाय. आपल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ म्हणतात, “एकेकाळी नथुरामचे पुतळे उभारू असे म्हणणारे भुजबळ साहेब हेचं. क्रांतीज्योती सावित्रीमाईंची पूजा करायला हवी पण सरस्वतीला विरोध कशासाठी? ते ज्या साडेतीन टक्क्याबद्दल बोलतायत, त्यातल्याच एकाच्या भिडे वाड्यात सावित्री माईंची शाळा भरली होती, हे सोयीस्कर विसरायचं का..? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
भुजबळांच्या वक्तव्यावर भाजप नेते राम कदम यांनीही टीका केली. ते म्हणाले, ‘आज यांना आमच्या देवी-देवतांचे फोटो खटकतात. उद्या मंदिरेही खटकतील. मंदिरे कशाला हवीत. ती पाडून टाका असंही म्हणतील. सर्वच महापुरुष आमच्यासाठी आराध्य आहेत. परंतु, राष्ट्रवादीची ही पद्धत कुठली? हिंदुत्वाबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीला का राग आहे? यांच्यासोबत पेग्विन सेनेचे नेते आहेत त्यांची काय भूमिका आहे? हिंदु देवी-देवतांचा अपमान राष्ट्रवादीनं केला आहे त्यांनी माफी मागायला हवी,’ असं राम कदमांनी म्हटलंय.