मुंबई | सध्या अस्तित्त्वाची लढाई लढत असलेल्या शिवसेनेसाठी आता ठाकरे कुटुंबातील जवळपास प्रत्येक सदस्य राजकीय मैदानात उतरताना दिसत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे गेल्या काही दिवसांमध्ये सतत राज्यभरातील शिवसैनिकांशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधत आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यादेखील शिवसैनिकांनाचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. नवरात्रौत्सवानिमित्त शिवसेनेकडून ‘बये दार उघड’ ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणून रश्मी ठाकरे या मुंबई आणि ठाण्याला भेट देणार आहेत.
रश्मी ठाकरे या बुधवारी मुंबादेवी आणि महालक्ष्मीच दर्शन घेणार आहेत. यानंतर रश्मी ठाकरे शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेऊ शकतात. तर गुरुवारी म्हणजे उद्या रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात जाणार आहेत. रश्मी ठाकरे या टेंभीनाका येथील देवीचे दर्शन घेतील. यावेळी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते देवीची आरती केली जाईल. त्यामुळे गुरुवारी रश्मी ठाकरे यांच्या दौऱ्याच्यानिमित्ताने ठाण्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दापोली येथील सभेत रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीन वेळा मंत्रालयात गेले आहेत. इतर वेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला होता.
रामदास कदम यांच्या या वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले होते. या टीकेनंतर रामदास कदम यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. रश्मी ठाकरेंबद्दल मी तसं बोलायला नको होतं, मी माझे शब्द मागे घेतो, मी अनवधानाने बोलून गेलो, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, मी वास्तव ते बोललो, ठाकरेंचा अपमान होईल असं काही बोललो नाही, पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे रामदास कदम यांनी म्हटले होते.