मुंबई | शिवसेना, महाराष्ट्राच्या राजकारणातलं एकेकाळचं सर्वात शक्तिशाली नाव. एक काळ तर असा होता की राज्यात सत्ता कोणाचीही असो, शब्द फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचाच चालायचा. बाळासाहेबांच्या शब्दापुढे जाण्याची कोणाचीच हिंमत नव्हती. प्रबोधनकार ठाकरेंपासून सुरू झालेला भिडस्तपणाचा, निर्भिडपणाचा वारसा पुढच्या पिढ्याही जपण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र हीच शिवसेना आता आपल्या अस्तित्वाची लढाई लढतेय. एकेकाळी स्वतःच कोर्ट असलेली शिवसेना आपल्या अस्तित्वासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहे. अशावेळी या ठाकरे परिवारानं पाया रोवलेल्या शिवसेनेला वाचवण्यासाठी मात्र ठाकरेच एकत्र नाहीत. पक्षातल्या बंडातली गोष्ट लांबचीच… पण ठाकरेंही एकत्र नाहीत. हा मुद्दा आत्ता उपस्थित होण्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विरोधात उभे ठाकलेले त्यांचे पुतणे.
आता उद्धव ठाकरेंचे पुतणे तेही विरोधातले. हे म्हणताच साहजिकच तुमच्या डोळ्यापुढे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचाच चेहरा आला असेल. मात्र हे समीकरण एवढं सोपं नाही. शिवसेनेतली, विशेषतः ठाकरे परिवारातली नाराजी केवळ राज आणि उद्धव इतकीच मर्यादित नाही. त्यात आता उद्धव ठाकरेंचे सख्खे भाऊ आणि बाळासाहेब ठाकरेंचा मोठा मुलगा बिंदूमाधव यांचीही एन्ट्री झालीय. बिंदूमाधव आता हयात नाहीत. मात्र त्यांचा मुलगा निहार याने या वादात आता उडी घेतली आहे. त्यामुळे ठाकरे परिवारातले मतभेद आता केवळ राज उद्धव इतकाच मर्यादित राहिलेला नाही.