मुंबई | युती सरकारच्या काळात भाजपच्या त्रासाला कंटाळून सर्वप्रथम आवाज उठवणारे शिवसेनेतील मंत्री हे एकनाथ शिंदे हेच होते. पण आता ते भाजपच्या इतक्या जवळ कसे गेले आहेत, हे फक्त ईडीचे डायरेक्टरच सांगू शकतात, अशी खोचक टिप्पणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. विनायक राऊत यांनी गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना 2014 सालचा राजकीय घटनापट मांडला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबतचा एक किस्सा सांगितला.
एकनाथ शिंदे यांनीच भाजपची साथ सोडा, असा आग्रह धरला होता. मी त्यांच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खूप आकांडतांडव घातले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढली होती. भाजपचा त्रास कसा असतो, हे उघडपणे सांगणारे तेव्हा एकनाथ शिंदे हेच होते. पण आता ते भाजपच्या इतक्या जवळ कसे गेले, याचे उत्तर फक्त सक्तवसुली संचलनालयाचे संचालकच सांगू शकतात, असे विनायक राऊत यांनी सांगितले. त्यामुळे आता या टीकेला एकनाथ शिंदे गटाकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.