मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्करोगाने ग्रस्त शिवसेना आमदार यामिनी जाधव यांची रुग्णलयात जाऊन भेट घेतली. यावेळी प्रकृतीची विचारपूस त्यांनी केली. मात्र त्यानंतर यामिनी जाधव यांनी पक्षनेतृत्वावरची नाराजी व्यक्त केली आहे.गेल्या काही दिवसापासून यामिनी जाधव या कर्करोगाशी झुंज देत आहेत. मुंबईतील सैफी रुग्णालयात त्या उपचार घेत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली.
यानंतर यामिनी जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर दुर्लक्ष केल्याचे, आमदारांना,खासदारांना, पक्षांतील लोकांना वेळ न दिल्याचे आरोप करत आपली खदखद बाहेर काढत आहे. यावेळी त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या व म्हणाल्या की काही दिवसात ज्या घडामोडी घडत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा उद्रेक आम्ही नक्कीच समजू शकतो. कारण आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत, यापुढेही शिवसैनिक राहणार आहोत, किंबहुना हे जग आम्ही शिवसैनिक म्हणूनच सोडणार आहोत. माझे पती यशवंत जाधव हे तर ४३ वर्षांपासून शिवसेनेत आहेत. वयाच्या १७ व्या वर्षींपासून शिवसैनिक आहेत. अनेकदा अडचणी आल्या, आर्थिक संकटं आली, निवडणुका हराव्या लागल्या. मात्र कधीही त्यांनी पक्षाबाबत वेगळा विचार केला नव्हता.
मागील ऑक्टोबर महिन्यापासून माझ्या आयुष्यात कॅन्सर नावाचं एक वादळ आलं. ज्यावेळी आम्हाला समजलं, त्यावेळी संपूर्ण कुटूंब तुटले. या आजाराची माहिती पक्षाच्या प्रमुख नेत्यांना यशवंत जाधव यांनी दिली. एक महिला आमदार म्हणून माझी अपेक्षा होती, की माझ्या घरी काही नेते येतील, आपल्या पक्षाच्या एका महिला आमदार कॅन्सरने त्रस्त आहेत, हीच गोष्ट मोठी हदरवणारी होती. मी स्वतः कॅन्सर या शब्दाने कोलमडून गेली होती. पण अशा परिस्थितीमध्ये माझ्या भायखळा मतदारसंघातील जनतेने, शिवसैनिकांनी खूप साथ दिली, मी आजही त्यांची आभारी आहे.
अपेक्षा होती, की विचारपूस केली जाईल, एक आधाराची थाप यशवंत जाधव अन् यामिनी जाधव यांच्या कुटूंबाला मिळेल. पण तसं काही झालं नाही. काही ठराविक लोकं, जसं किशोरीताई माझ्या घरी आल्या. दोन तास बसल्या. अनेक कॅन्सरशी संबंधित सुचना त्यांनी दिल्या, अध्यात्मिक सुचना दिल्या, आधार दिला. हे करं तुला बरं वाटेल, असं सांगितले. पण ज्यांच्याकडून अपेक्षा होती, त्यापैकी कोणीही अगदी कोणीही भेटायला आले नाही. मी स्वतः २०१२ पासून नगरसेविका आहे. बऱ्याच आमदारांच्या पत्नींना कॅन्सर झाला, त्यांना भेटायला पक्षाचे नेते हॉस्पिटलमध्ये गेल्याचे मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. मग त्यांच्याप्रमाणे मी देखील मरणासन्न अवस्थेमध्ये गेल्यानंतर माझ्या पक्षातील नेते मला आधार द्यायला येणार होते का? ही गोष्ट मनाला खलत होती.याशिवाय मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या अडचणींमधून माझे कुटूंब जात आहे. त्यातही कोणी आधार, कोणाचे मार्गदर्शन, कोणाच्या चांगल्या सुचना आम्हाला मिळाल्या नाहीत. दोघेचं कुटूंबासाठी हात-पाय मारत राहिलो, आणि मग या निर्णयापर्यंत पोहचलो. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. बऱ्याच दिवसांपासून याची प्रक्रिया होती. मनाला आजही यातना होत आहेत. पण एक मात्र नक्की यशंवत जाधव आणि यामिनी जाधव यांनी शिवसेना सोडून दुसरा कोणताही जॉईन केलेला नाही. कॅन्सरच्या ज्या अवस्थेमध्ये भायखळा विधानसभेने जे आम्हाला समजून घेतले, किंबहुना भायखळा विधानसभेचा इतिहासच शिवसैनिकांनी घडवलेला आहे. त्याच शिवसैनिकांनी आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. यामिनी जाधव आणि यशवंत जाधव शिवसेनेविरुद्ध कधीही जाणार नाहीत, बेईमानी करणार नाहीत. काहीतरी कारण त्यामागे असेल, हे शोधण्याची आज गरज आहे, असे म्हणतं त्यांनी शिवसैनिकांनी आपल्याला समजून घ्यावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.