बीड | शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 1996 साली उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून आम्ही बाळासाहेब ठाकरे (यांची भेट घेतली. आणि उद्धवजी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद द्यावे असा आग्रह केला असल्याचं ते म्हणाले. या सांगण्यामागचे मुख्य सूत्रधार हे देखील उद्धव ठाकरेच होते असंही त्यांनी स्पष्ट केलं. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
माजी मंत्री सुरेश नवले हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामिल झाले आहेत. ते म्हणाले की, “1996 पासून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. मात्र ती पूर्ण झाली नाही. ज्या वेळेस राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला, त्यावेळी त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण झाली.”
राज्यात 1995 साली शिवसेना-भाजप युतीचं सरकार पहिल्यांदा सत्तेत आलं होतं. त्यावेळी सुरुवातीला मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला. नंतर फेब्रुवारी 1999 ते ऑक्टोबर 1999 अशा नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी नारायण राणे यांंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या संबंधित वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “मी मुख्यमंत्री झाल्यानंतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे अचानक राजकारणात सक्रिय झाले. आपण मुख्यमंत्री झाल्याचं त्यांना पचलं नाही, त्यामुळेच त्यांच्या जवळच्या लोकांनी राजकारणात येण्याचा सल्ला दिला.”