मुंबई | शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला अवघे दोन दिवस उरलेले आहेत. दोन्ही गट शक्ती प्रदर्शनाबरोबरचं जोरदार तयारीला लागले आहे.
मात्र ही तयारी चालू असताना दोन्ही गटाकडून एकमेकांवर खोचक टीकाही केली जात आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची खिल्ली उडवली आहे. आमचा दसरा मेळावा हा शिंदे गटाचा मेळावा नाही. हा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून शिवसेनेला मदत मिळत आहे आणि काल त्यांच्या गटातील नेते हे भारत जोडो अभियानाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यामुळे त्यांचा होणारा हा दसरा मेळावा हा शिवसेनेचा नसून हा महाविकास आघाडीचा मेळावा आहे, अशा शब्दात उदय सामंत यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची खिल्ली उडवली. उदय सामंत हे बीकेसी मैदानावर होणाऱ्यांची शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
यावेळी शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली.आमची खरी शिवसेना आहे आणि त्यांचा मेळावा होणार आहे. हा अभूतपूर्व असा मेळावा होणार आहे, असं अडसूळ यांनी स्पष्ट केलं.
शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनीही यावेळी मैदानाची पाहणी केली. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असा हा दसरा मेळावा होणार आहे. मुंबईकराना कुठे ही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पार्किंगची योग्य व्यवस्था असेल. बीकेसीमधील जे मोकळे भूखंड आहेत त्यांचा उपयोग पार्किंगसाठी करण्यात येणार आहे. या दसरा मेळाव्याला महिलांची मोठी गर्दी असणार आहे, असं शीतल म्हात्रे यांनी सांगितलं.