जळगाव | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याप्रसंगी रामदास आठवले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठले यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्ष नेते अजित पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कॉपी करत राहुल गांधी पावसात भिजले तरी काँग्रेसला भिजवण्याची ताकद त्यांच्यात नाही, अशी घणाघातील टीका आठवले यांनी केली. अजित पवारांना पहाटेची शपथ घेण्याची सवय आहे. कदाचित अजित पवार युती सरकार मध्ये येत असतील. अजित पवार आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागतच आहे, असे रामदास आठवले म्हणाले. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देण्याचं एकनाथ शिंदे यांच्यात सामर्थ्य आहे. टपरीवाले असे हिनवल्या जाणाऱ्या गुलाबराव पाटलांनी शिवसेनेला चुना लावल्याचेही आठवले म्हणाले.
पावसात भिजवून राहुल गांधी यांनी शरद पवारांची कॉपी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते जरी पावसाने भिजले असतील तरी काँग्रेसला भिजवण्या एवढी ताकद त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे त्यांना फारसा फायदा होणार नाही. तसेच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही भारत जोडण्यापेक्षा भारत तोडण्यासाठी यात्रा आहे. त्यामुळे काँग्रेसला बळ देण्याची ताकद ही राहुल गांधी मध्ये नसल्याचे रामदास आठवले म्हणाले.
तर अजित पवार यांना पहाटे शपथ घेण्याची सवय असून त्यामुळे आम्ही केव्हा येऊ हे सांगता येणार नाही असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. कदाचित अजित पवार इकडे येत असतील ते आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागत आहे, पहाटेची शपथविधी घेऊन जी अजित पवारांना जमले नाही ते डेरिंग एकनाथ शिंदेंनी केले असल्याचे म्हणत रामदास आठवलेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.