मुंबई | गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय असलेला दसरा मेळावा अखेर बुधवार (दि.०५ ऑक्टोबर २०२२) सायंकाळी पार पडला. उद्धव ठाकरे गट यांचा शिवाजी पार्क येथे तर एकनाथ शिंदे गट यांचा बीकेसी मैदान याठिकाणी असे दोन वेगवेगळे दसरा मेळावे मोठ्या दिमाखात करण्यात आले. शिवसैनिकांची प्रचंड मोठी गर्दी आख्या महाराष्ट्राने पाहिली. अनके राजकीय नेत्यांची भाषणे यावेळी झाली, पण उत्सुकता होती उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भाषणांची.
सर्वप्रथम भाषण कोण करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. प्रथम शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. नंतर बीकेसी मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण सुरु केले. यावेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा वर्षाव झाला. हिंदुत्व, एकनिष्ठा, दगेबाजी, एकता, गद्दारी अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श केला गेला. मात्र प्रश्न असा आहे कि या दोन्ही नेत्यांपैकी कोणाच्या सभेला गर्दी अधिक प्रमाणात होती याचे उत्तर अखेर समोर आले आहे.
एका प्रसार माध्यमाच्या जाहीर केलेल्या ट्विटर पोलद्वारे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी वाचकांना कोणाचे भाषण जास्त आवडले? असे विचारले असता एकूण ३९९८ जणांनी आपले मत नोंदविले. त्यापैकी ५९.१० टक्के लोकांना उद्धव ठाकरे यांचे भाषण आवडले. तर ४०.९० टक्के वाचकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला पसंती दिली.
त्याचप्रमाणे, शिवाजी पार्क येथे अडीच लाखांहून अधिक लोक जमले होते. एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला त्तीन लाखांची गर्दी होती असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांच्या माहितीनुसार शिवाजी पार्कची क्षमता ८० हजारांची असून उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला एक लाख आणि बीकेसी मैदानाची क्षमता १ लाख असून एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला दोन लाख शिवसैनिकांची गर्दी होती.
यावरून उद्धव ठाकरे यांचे भाषण लोकांच्या जास्त पसंतीस पात्र ठरले आहे. तर बीकेसी मैदानावर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.