दिल्ली | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. समता पार्टीने ठाकरे गटाला मिळालेले मशाल चिन्हावर दावा केल्याची याचिका
दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. आज दिल्ली उच्च न्यायालयाने समता पार्टीची ही याचिका फेटाळली आहे.
शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर शिवसेना कोणाची यावर शिवसेनेतीलच दोन गटांमध्ये वाद चालू होते. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव गोठवून शिंदे आणि ठाकरे गटाला नवीन नावे आणि चिन्हे दिली.
ठाकरे गटाला मशाल हे नवीन चिन्ह मिळाले. मात्र समता पार्टीने मशाल हे चिन्ह आमचे असल्याचा दावा करत दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. अखेर आज झालेल्या सुनावणीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने समता पार्टीची याचिका फेटाळली.
समता पार्टीचे काही वर्षांपूर्वी विलीनीकरण झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांचे मशाल हे चिन्ह गोठवले होते. ठाकरे गटाकडून मशाल या चिन्हाची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाच्या शिवसेनेला ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आले होते.