मुंबई | महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकमेकावर आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. महाविकास आघाडीविरुध्द शिंदे-फडणवीस सरकार असे दोन टोक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय.
नव्याने सत्तेत आलेल्या सरकारमध्ये काहीच ताळमेळ नाही. जे लोक शिवसेनेमधून गेले. ते काही ना काही उद्देश व लाभ ठरवून गेले आहेत हे जनतेच्या लक्षात आले आहे. गेलेल्या काही आमदारांना पश्चाताप झाला असून ते पुनर्विचार करायला लागले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात राजकीय चित्र पालटू शकेल असे विधान जयंत पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत केले.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची पावसामुळे झालेली प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारनं जनतेच्या मदतीला जायला पाहिजे होतं. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचं दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची जोरदार टीका पाटील यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना नामोहरम करणं आणि त्यांना अडचणीत आणणं असा उद्योग काही लोक करत आहेत.परंतु, त्यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी उद्धव ठाकरे दबावाला बळी पडू शकत नाहीत, असंही पाटील म्हणाले.