मुंबई | शिवसेनचे खासदार संजय राऊत यांना कारागृहातच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. राऊतांच्या जामीन अर्जावर आता २ नोव्हेंबर रोजी सुनावणी केली जाणार आहे. संजय राऊतांचा कारागृहातील मुक्काम १३ दिवसांनी वाढला आहे. त्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडी २ नोव्हेंबर पर्यंत असणार आहे.
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड येथील कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी हात असल्याचा आरोप केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून ११२ कोटी रुपये मिळाले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करुन सर्व व्यवहार करत होते असं ईडीने म्हटलं आहे.
दरम्यान, ईडीने केलेल्या दाव्यानुसार जीएपीसीएलने बेकायदेशीर कारवाईमधून 1,039.79 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून १०० कोटी रुपये मिळाले. हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राऊत यांच्या जवळचे, कुटुंबातले सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत. ज्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे, असं इडीने सांगितले. २०१० साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी ८३ लाख रुपये जमा केले होते.