मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सरकारचे सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर शिवसेनेचे अनेक खासदार, आमदार एकनाथ शिंदे यांनी फोडले. भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे यांनी सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. पण आता भाजप शिंदे गटाचे आमदार फोडणार का? यावर भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Dadarao Danve) यांनी मोठं विधान केले आहे. ‘भाजप शिंदे गटाचा एकही आमदार फोडणार नाही. कारण आम्ही एकत्र आहोत’, असे ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलथापालथ होताना दिसत आहेत. आमदार फोडाफोडीचे राजकारणही पाहिला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार फोडल्यानंतर रावसाहेब दानवे यांना या फोडाफोडाची राजकारणाबाबत विचारले असता त्यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले. दानवे म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष कोणत्याही राजकीय पक्ष फोडणार नाही. शिवसेनेने आम्हाला धोका दिला. पण आम्ही त्यांचेही आमदार फोडले नाही. शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली. आम्ही शिवसेनेला पाडले नाही. परंतु त्यांच्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे ते पडले. भाजप शिंदे गटाचा एकही आमदार फोडणार नाही. कारण आम्ही एकत्र आहोत’.
मीडियाने आमच्यात भांडणे लावू नयेत
अर्जुन खोतकर आणि माझ्यामधील कटुता संपली आहे. मीडियाने आमच्यात आता भांडणे लावू नये. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत. कारण त्यांना अस्तित्व टिकवायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.