पुणे | अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासारखा व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर असल्यास राज्याचा नक्कीच फायदा होईल. अजितदादांकडे असलेल्या अनुभवामुळे राज्यातील नागरिकांना योग्यवेळी निर्णय घेतल्याचा फायदा होईल, असे विधान कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. त्यानंतर आता रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत विधान केले आहे. ते म्हणाले, ‘अजितदादांसारखी व्यक्ती प्रशासनाला विश्वासात घेऊ शकते. लगेच निर्णय घेऊ शकते. अजित पवार यांच्यासारखा व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर असल्यास राज्याचा नक्कीच फायदा होईल. महाराष्ट्रावर अडचण येईल तेव्हा राजकारणाचा विचार न करता अजित पवार निर्णय घेतात.’
दरम्यान, नोटांवर कोणाचा फोटो असावा यापेक्षा ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना ओला दुष्काळ जाहीर करुन मदत मिळावी, हा विषय महत्वाचा असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले.