ठाणे : दहीहंडी उत्सवाचा थरार आज महाराष्ट्रभर आणि खासकरून मुंबई आणि उपनगरांमध्ये पाहायला मिळत आहे. दहीहंडीच्या उत्सवाच्या निमित्ताने राजकीय शक्ती प्रदर्शनाचे थर पाहायला मिळत आहेत. ठाणे येथील टेंभी नाका इथल्या मानाच्या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावून सर्वांना शुभेच्छा देताना गोविंदा थरावर थर लावून हंडी फोडतात, त्यांच्याप्रमाणेच आम्ही 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी मागच्या दीड महिन्यांपूर्वी फोडली असा टोला हाणला. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असून असेच थर यापुढे वाढत जातील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव दणक्यात साजरा करा. कोरोनाचा धोका अजून आहे, त्यामुळे हंडी फोडण्याबरोबरच आरोग्याचीही काळजी घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे.
टेंभी नाका उत्सवात हजेरी लावलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. स्टेजवर येताच यावेळचा गोविंदा जोरात आहे ना ? अशी साद त्यांनी गोविंदांना घातली. शिंदे म्हणाले की, गोविंदांचा विमा काढला असून लोकप्रतिनिधींनी यास खेळाचा दर्जा देण्याची मागणी केली होती ती मान्य करण्यात आली आहे. प्रो कबडी प्रमाणे पुढच्या वर्षी प्रो गोविंदा होईल आणि नोकरीत 5 टक्के आरक्षण मिळणार असल्याचेही ते म्हणाले.