मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. मात्र पीएमएलए न्यायालयाने अखेर त्यांना जामीन मंजूर केला आहे. सध्याच्या कसोटीच्या काळात संजय राऊतांना जामीन मिळणे हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासाच म्हणावा लागेल. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, आतापर्यंत पीएमएलए कोर्टाने त्यांना जामीन दिला नव्हता. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. तपास यंत्रणेचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता. अखेर आज कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.
ईडीने पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ऑगस्ट महिन्यात संजय राऊत यांना अटक केली होती. तेव्हापासून संजय राऊतांना तुरुंगवास भोगावा लागला.
दरम्यान, गेल्या अडीच वर्षांमध्ये संजय राऊत यांनी वेळोवेळी शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडली होती. शिवसेनेचा अजेंडा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम संजय राऊत हे चोखपणे पार पाडत होते. संजय राऊत भाजपा विरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची भूमिका लोकांना पटवून देण्याचे काम करत होते.
मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संजय राऊत काही काळातच तुरुंगात गेल्याने ठाकरे गटाकडे प्रभावीपणे पक्षाची बाजू मांडणारा वक्ता उरला नव्हता पण आता संजय राऊत पुन्हा तुरुंगातून बाहेर आल्यास पुन्हा एकदा नव्या जोमाने भाजप आणि शिंदे गटावर तुटून पडताना दिसतील.