मुंबई | राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर जो आरोप केला गेला आणि विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला आहे तो चुकीचा आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
व्हिडिओ पाहून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे उभे होते. पोलीस देखील होते. मला तर हा जोक वाटतो. मला विचाराल तर हा राज्यातल्या सगळ्या महिलांचा अपमान आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं नसतं. माझ्याकडे व्हिडिओ आहे मी सगळ्या चॅनल्सवर तो प्ले करायला तयार आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
राज्याचे माननीय मुख्यमंत्री आहेत, पोलीस आहेत आणि जितेंद्र आव्हाड त्या व्हिडिओत फक्त एका सेकंदासाठी त्या ताईला बाजूला करताना दिसत आहेत. हा विनयभंग होतो का? त्यांनी फक्त तिला बाजूला केलं आहे. आरोप करणं चुकीचं नाही खोटे आरोप करू नका. हा प्रकार गैरसमजातून झाला आहे. संबंधित महिलेची बाजू नक्की ऐकून घेतली पाहिजे. पण जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचं टोकाचं पाऊल उचलणं अयोग्य आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हर हर महादेवच्या वादातही जितेंद्र आव्हाड यांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. जामीन झाला. आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्याला काय अर्थ आहे मला कळत नाही. या सरकारमधले आमदार शिवीगाळ करतात, पोलीस ठाण्यात गोळीबार करतात त्याचं काय? मला शिवीगाळ करण्यात आली मी राजीनाम्याची मागणी आजपर्यंत केलेली नाही हे सगळे गुन्हे नाहीत का? या सगळ्यांना १०० गुन्हे माफ आहेत का? असाही प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे