पुणे | ”राज्यपाल ही एक संस्था आहे. त्याच्या काही मर्यादा आणि बंधन असतात. मात्र, छत्रपतींचा उल्लेख करताना त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या आहेत. याचा निकाल राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी घ्यावा. अशा व्यक्तीला अशा (राज्यपाल पदासारख्या) जबाबदाऱ्या देऊ नये”, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यात आता शरद पवार यांनीही विधान केले आहे. ते म्हणाले, राज्यपाल हे एक संस्थात्मक पद असलं तर विद्यमान राज्यपालांनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केले आहे. त्यांनी छत्रपतींचा उल्लेख करताना सगळ्या मर्यादा सोडल्या आहेत. त्या प्रकरणानंतर त्यांचं छत्रपतींबद्दल (चांगलं) बोलल्याचं स्टेटमेंट आलं. मात्र, सगळ्या प्रतिक्रियानंतर केलेलं हे विधान म्हणजे उशीराचं शहाणपण आहे.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानानंतर राज्यभरात वादंग निर्माण झाला आहे. त्यात अनेक नेतेमंडळींनी विधाने केली आहेत. आता शरद पवार यांनी वक्तव्य करून त्यांच्या विधानाचा समाचार घेतला.