भारत सध्या कठिण काळातून जात आहे. मात्र, आम्ही इंग्रजांविरोधात लढलो आहोत, त्यामुळे आम्ही घाबरणार नाही, यांच्याविरोधात देखील लढत राहू, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरमध्ये सद्भावना रॅलीमध्ये बोलताना केला. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर चांगलाच हल्ला चढवला.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं त्याची इतिहासात नोंद होईल, अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. महाविकास आघाडी सरकारने खूप चांगल्या पद्धतीने काम केल्याचेही ते म्हणाले. आजारपणामुळे काही करू शकले नाहीत म्हणून असा उल्लेख करणं चुकीचं असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळासाहेब थोरात म्हणाले की देशात महागाई वाढली की, धर्माच्या नावाने राजकारण केले जाते. त्यामुळे देश सध्या कठिण काळातून जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडोची मोहीम सुरु आहे. त्यामुळे आम्ही यांच्याविरोधात लढत राहू, असे थोरात म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी कोल्हापूरच्या काँग्रेसच्या नेतृत्वाचे कौतूक करताना कोल्हापूरकरांनी सांगितलं की, मला उपस्थित राहावं लागत. मला सगळ्यात जास्त कोल्हापूर जिल्हा आवडतो. काँग्रेसकडून पी. एन. पाटील यांचे आभार मानतो. कारण गेली 29 वर्षे ही सद्भावना दौड कायम ठेवणं सोप्प नाही. आयुष्यात चढ उतार हे असतात, पण आपल्या विचाराशी कायम राहणं गरजेचं असतं, आमचा विचार हा शाश्वत विचार असल्याचे थोरात म्हणाले.
महात्मा गांधी यांनी जो अहिंसेचा विचार दिला, त्यामुळे देशात लोकशाही टिकली आहे. काँग्रेसला ताकद देणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरचं नाव घ्यावं लागतं. संपूर्ण देशात छत्रपती शाहू महाराज यांचे नाव घेतलं जातं, तो विचार पुढे घेऊन जाण्याचं काम केलं जातं.
बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारच्या कारभारावर हल्ला चढवला. ते म्हणाले की, 8 वर्षात एनडीए सरकारने काय केलं याचं उत्तर त्यांनी द्यावे. 2024 ची लोकसभा डोळ्यासमोर ठेवून काम केलं जातं. महागाई वाढली की धर्माच्या नावाने राजकारण केलं जातं. भारत सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, ज्यांनी तंत्रज्ञानाला विरोध केला, तेच त्याचाच वापर करून सत्तेत आल्याचा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला.