मुंबई | शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
बाळासाहेबांची इच्छा नसणाऱ्या लोकांसोबत सत्ता बनवली. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही मुलगा आणि वडील मंत्री झाले नाहीत. ते यांनी घडवलं, त्यांना लोकशाहीची परंपरा तोडावी लागली असा टोमणा केसरकरांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता मारला आहे. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे हे चुकीच्या गोष्टी पसरवत असून गोबेल्सची नीती वापरत आहेत मात्र महाराष्ट्रात गोबेल्स तयार होऊ नये, असंही मत दीपक केसरकरांनी मांडले आहे.
अमित शहांच्या चर्चेचा हवाला देता तर मोदी यांच्यासोबत काय चर्चा झाली ते सांगा. भाजपशी चर्चा न करता काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार बनवलं गेलं. जनतेला दिलेला शब्द यांनी मोडला, असा आरोपही दीपक केसरकर यांनी केला आहे.
महानगरपालिका निवडणुकीत होणार युती
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट महापालिकेतही युती करणार आहे. दोघंही मिळून 150 पेक्षा जास्त जागा निवडून आणू. आमची युती आता कायम राहणार आहे. आमच्या स्वार्थासाठी आम्ही कधीही युती तोडणार नाही. असे दीपक केसरकर यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी एक गौप्यस्फोट केला की महापालिकेत भाजपची सत्ता 2017 मध्ये आली असती. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा मान ठेवून काही केलं नाही, असा दावा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
दीपक केसरकर म्हणाले, हे आमच्या बद्दल सर्वत्र काहीही बोलत आहेत. पण आता आमचा प्रत्येक प्रवक्ता यांना उत्तर देईल. कारण आम्ही बोललो नाही तर लोकांना त्यांचं खरं वाटायचं.
म्हणून आता आम्ही या सर्वांबद्दल बोलू, पण आम्हाला त्यांच्याबद्दल घाणेरडं बोलायचं नाही.