मुंबई | महाराष्ट्रात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असून माजी आमदार आणि शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावर विधानसभेत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांचा अपघात नेमका कशा प्रकारे घडला, याची सविस्तर माहिती सभागृहाला दिली.
त्याचबरोबर याप्रकरणाची संपुर्ण कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही दिले. तसेच, यापुढे सरकारने अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी सर्व आमदारांच्या वाहनचालकांसाठी नवे आदेश काढले. त्यानुसार सर्व आमदारांच्या वाहनचालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्या अंतर्गत या सर्वांसाठी आपत्कालीन परिस्थितीत खबरदारी कशी घ्यायची आणि रस्ते नियम यासाठी परिवहन विभागाकडून प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, सर्व आमदारांनी आपापल्या वाहनचालकांना प्रशिक्षणासाठी पाठवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. तसा प्रस्ताव आज विधानसभेत मांडण्यात आला, त्याला विरोधकांनीही चांगला पाठिंबा दिला.
सदर प्रशिक्षण हे २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे.अध्यक्षांनी सर्व आमदारांनी त्यांच्या वाहनचालकांना या प्रशिक्षणासाठी पाठवावे, अशी सूचना दिली. याच पार्श्वभूमीवर आज विधानसभेत विनायक मेटेंच्या अपघातावर निवेदन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी याविषयी निवेदन मांडले. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विनायक मेटेंच्या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तसेच, याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांच्या कडून देण्यात आले आहेत.
फडणवीस यावेळी म्हणाले की, सध्या आपली वाहतूक यंत्रणा बदलण्याची गरज आहे, ११२ ला कॉल गेल्यानंतर त्याचं थेट लोकेशन गेलं पाहिजे, समोरच्याने पत्ता चुकीचा सांगितला तरी लोकेशन जर गेलं असतं, तर पोलीस वेळेवर पोहोचू शकले असते. त्यासाठी सरकार काही उपाययोजना करणार आहे. डिजीटल लोकेशनच्या आधारे पोलीस स्टेशनला माहिती मिळाली पाहिजे, याची व्यवस्था केली पाहिजे. मोठे ट्रेलर जे लेन सोडून चालतात त्यांच्यावर नियंत्रण नाही, यासंबंधी लवकरच एक आयटीएमएस सिस्टीम संपूर्ण मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर तयार करणार आहोत. एआयचा वापर करुन ट्रॅकिंग करु शकू, जेणेकरुन अशा प्रकारच्या लेन सोडून चालणाऱ्या वाहनांची माहिती मिळू शकेल.