मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेदवरून राजकारणात वादंग निर्माण झाला आहे. उर्फिच्या तोकड्या कपड्यांवरून सुरु झालेला वाद अजूनचं तीव्र होत चालला आहे. उर्फी जावेदमुळे रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ आमने-सामने आल्या आहेत. अशातच आज उर्फी जावेद रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे.
उर्फी जावेद राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सार्वजनिक ठिकाणी उर्फीला थोबाड फोडणार असल्याची धमकी दिली होती. त्याचप्रकरणी उर्फी चाकणकर यांची भेट घेत मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
उर्फी जावेदच्या कपड्यावरून सुरु झालेल्या वादावरून चित्रा वाघ यांनी महिला आयोगाला खडेबोल सुनावले होते. तसेच, चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या कामावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बजावली होती. महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी दोन दिवसांत खुलासा करावा, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, या नोटीशीनंतर स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचं आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीस पाठवण्याचा, तर मला येणाऱ्या अशा ५६ नोटीशीत आणखी १ ची भर पडलीय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं होतं.