आम्हाला गद्दार म्हटलं जात आहे, परंतु, आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आमच्या बापानं ही शिवसेना उभी केली आहे, असं वक्तव्य शिवसेनेच्या बंडखोर खासदार भावना गवळी यांनी केलंय. भावना गवळी यांनी आज त्यांच्या वाशिम या मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. भावना गवळी यांनी जाहीर सभा घेत यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.
“ही लोकं आम्हाला गद्दार म्हणतात. मात्र, शिवसेना कोणाच्या बापाची नाही. आम्ही वर्षानुवर्षे काम करून शिवसेना वाढविली आहे. 40 आमदार आणि 12 खासदार का सोडून गेले, याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा टोला यावेळी भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
भावना गवळी म्हणाल्या, या मतदारसंघात पुन्हा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला साथ दिली. देवेंद्र फडणवीस ही त्यांच्या सोबत होते. अडचणीच्या काळात ज्यांनी मदत केली नाही, त्यांना आठवू इच्छित नाही. मात्र अडचणीत असताना ज्यांनी मदत केली त्यांची साथ कधीच सोडणार नाही. 25 वर्षात अनेक विकास कामे केली, मात्र अजून ही अनेक कामे शिल्लक आहेत. पिण्याच्या पाण्याच्या योजनेची उंची वाढविण्याची गरज आहे, विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्याची गरज आहे.