नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे गट आणि शिंदे गटाची रणनीती सुरु आहे. आधी शिवसेना पक्षाबाबत आणि आता धनुष्यबाण चिन्हाबाबत वादंग निर्माण झाला आहे. त्यातच समता पार्टीने मशाल या निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह गमावलेल्या ठाकरे गटाकडून मशाल चिन्ह जाणार की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या चर्चेवर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “मेलेल्यांना जिवंत करणं हास्यास्पदच नाही तर लोकशाहीसाठी धोकादायक आहे”, असं अनिल देसाई यांनी म्हटलं आहे.
समता पार्टीने निवडणूक आयोगाकडे त्यासंबंधीचा अर्जही दाखल केला आहे. समता पार्टी डी रजिस्टर कशामुळे झाली? निवडणूक आयोगाने त्यावर निर्णय दिला आहे. पुन्हा समता पार्टीला जिवंत केलं जात असेल तर ते चुकीचं आहे. समता पार्टीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचं अभिनंदन केलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कुणी कुणाचं अभिनंदन करावं, अदानप्रदान करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यावर बोलणं योग्य राहणार नाही, असं देसाई म्हणाले.
काल काही विषयांवर युक्तिवाद होता. त्यावर आज पुन्हा युक्तिवाद होणार आहे. कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत हे युक्तिवाद करतील. आज आणि उद्या सुद्धा ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. पण कोर्ट ज्या पद्धतीने वेळेची आखणी करून देईल. त्यानुसार जावं लागणार आहे. विरोधी गटाच्या वकिलांचाही युक्तिवाद होणार आहे. त्यामुळे हा आणि पुढचा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. भारताच्या लोकशाहीत झालेला हा पेचप्रसंग कसा सुटेल हे पाहावं लागणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर बोलताना, कुणीच आयोगाच्या निर्णयाचं समर्थन केलं नाही. सामान्य लोकांनाही हा निर्णय पटला नाही. घातक आणि धक्कादायक निकाल आहे. निवडणूक आयोग ही लोकशाहीची बूज राखणारी संस्था आहे. त्यांनीच वेगळा निकाल दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे असं देसाई म्हटले.
त्याचबरोबर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय निस्तरणार कसा? ते निस्तरलं नाही तर लोकशाही खिळखिळी होईल. प्रत्येकजण आपआपल्या परीने कायद्याचं आकलन करत असतो. आम्ही उच्च न्यायालयात जावं असं लोक सांगतात. पण तसं असतं तर सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला सांगितलं असतं, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.