मुंबई : नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत असलेले मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहेत. त्यांच्या विविध पोस्ट्स व्हायरल होतात. सामाजिक तसंच राजकीय विषयांवर ते अनेकदा सडेतोड बोलताना दिसतात. दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी प्रेरित असणाऱ्या शरद पोंक्षे यांची लेटेस्ट पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी सावरकरांवर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या एका ट्विटर युजरचा समाचार घेतला आहे. त्यांनी या युजरने केलेल्या पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे.
शरद यांंनी नुकत्याच केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये मोना आंबेगावकर नावाच्या एका ट्विटर युजरने केलेल्या पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला. या ट्वीटमध्ये संबंधित युजरने आक्षेपार्ह भाषेत स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली आहे. मोना या युजरचे ट्वीट रीट्विट करणाऱ्या सुजाता आनंदन नावाच्या युजरने देखील सावरकरांवर आक्षेपार्ह कमेंट केली आहे. या दोन्ही ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर करत शरद पोंक्षे यांनी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिचा उल्लेख करत एक सवाल उपस्थित केलाय.
ते म्हणतात की, ‘कोणताही पुरावा नसताना सावरकरांची बदनामी करणाऱ्या ह्या मोनाचा तीव्र शब्दात निषेध. केतकी सारखं हिला तुरूंगात टाकणार का?’ या पोस्टवर अनेकांनी टिका देखील केल्या आहेत.