कोल्हापूर | पुण्यात झालेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली. अनेक दिग्गज नेते स्वतः या निवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात दाखल झाले होते. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले. या पराभवावरुन भाजपवर टीका होत असतानाच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. ऐन प्रचारात त्यांनी “हू इज धंगेकर” असा उल्लेख करत धंगेकरांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हाच धागा पकडून आता पुण्यामध्ये “धिस इज धंगेकर” असे बॅनर लागले आहेत. आता त्याच पद्धतीने कोल्हापुरातही बॅनर लावून पाटील यांना डिवचण्यात आलं आहे.
मविआच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांनी प्रचारामध्ये सर्वसामान्य घरातील असलेल्या धंगेकर यांचा अपमानास्पद उल्लेख केला होता. म्हणूनच हे होर्डिंग लावल्याचे म्हटले आहे. स्वतःला गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून घेतात आणि दुसऱ्याला मात्र खालच्या पातळीवर बोलतात, अशी टीकाही त्यांनी केली. २०२४ मध्येही अशाच पद्धतीचे चित्र पाहायला मिळेल, असं मविआच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपने कसब्यातून रवींद्र धंगेकरांना पराभूत करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते. धंगेकरांच्या समर्थकांनी संपूर्ण कसब्यात पुणेरी पाट्या लावल्या. विजयानंतर त्यांनी कविताही व्हायरल करुन चंद्रकात पाटलांना उत्तर दिलं.
व्हायरल होत असलेली कविता पुढीलप्रमाणे –
Who is dhangekar?
ज्याने पाडला गणेश बिडकर,
केला गड सर,
Who is dhangekar?
ज्याने वाटायला लावले,
चांदीच्या विटा, सोन्याचे डॉलर,
Who is dhangekar?
प्रचाराला लावले RSS चे केडर,
भले-भले मोठे बिल्डर,
Who is dhangekar?
देशाचे नेते फिरवले गल्लीभर,
धास्तीने जागेच रात्रभर,
Who is dhangekar?
ज्याने अश्रू आणले ओठांवर,
बंगल्याचे ओझे पेठांवर,
Who is dhangekar?
ज्याने आठवायला लावले पुण्येश्वर,
नदीत उतरून पहाय लावले ओंकारेश्वर,
Who is dhangekar?
जबरदस्तीने पैसे वाटतो हरिहर,
नाकारता हात उचलतो आया-बहिणींवर,
Who is dhangekar?
घाम फुटलाय ज्याच्या धाकावर,
ज्याने खोबऱ्याचे तेल आणलय कपाळावर, नाकावर.
कळले का?