मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर करण्यात आली. त्याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. यावर ठाकरे गटाने देखील सामनामधील अग्रलेखातून प्रतिक्रिया देत अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र आहेत. त्यांचे बोलणे हा त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे, पण एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणारे तुमच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले. जरी अमृतावहिनींनी यासंदर्भात आता एफआयआर दाखल केला असला तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. कारण हे प्रकरण गंभीर आहे.
अमृता फडणवीसांच्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डिझायनर अनीक्षाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, या प्रकरणावरुन फडणवीसांवर देखील निशाणा साधला. ‘लाच’ हाच परवलीचा शब्द झाला आहे अशी टीका करत ठाकरे गटाने फडणवीसांना डिवचण्याचा प्रयत्न केला. तसेच, ‘लाच’ देणे व घेणे यात गैर वाटत नाही अशी महाराष्ट्राची प्रतिमा झाली आहे व त्यामुळेच हे राज्य भविष्यात संतसज्जनांचे राहील काय, असा प्रश्न पडतो. गौतम अदानी यांच्या भ्रष्टाचारावर, दरोडेखोरीवर महाराष्ट्राचे सरकार गप्प आहे.
राज्यात सध्या काहीही घडू शकते. कायद्याचे राज्य साफ कोसळले आहे. ते असेच कोसळत राहिले तर महाराष्ट्र कोसळेल व महाराष्ट्राच्या प्रतिमेस तडेच तडे जातील. त्यास सुरुवात झाली आहे. असा इशाराही सामना अग्रलेखातून दिला आहे.