पुणे | नुकतीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यांनतर राष्ट्रवादीचे सर्व नेतेमंडळी तसेच पक्षाचे कार्यकर्ते भावूक झालेले पाहायला मिळालं. त्यांच्या या घोषणेनंतर राज्यामध्ये विविध राजकीय पडसात उमटत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करत शरद पवारांच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
कितीही इच्छा झाली तरी किमान भक्तांच्या श्रद्धेसाठी देवाला देवपण सोडता येत नाही, अगदी तसंच पवार साहेबांनीही अध्यक्षपद सोडू नये. साहेबांनी आपली भूमिका न बदलल्यास माझ्यासह पुणे शहर कार्यकारणीतील तमाम सदस्य राजीनामा देत आहोत, जिथे आमचा देव नाही तिथे आमचा नमस्कारही नाही असे ट्विट जगताप यांनी केले आहे.
दरम्यान, मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी ही निवृत्तीची घोषणा केली. राष्ट्रवादीच्या पुढच्या अध्यक्षपदासाठी नवीन समिती स्थापन करणार आहोत. नवीन समिती अध्यक्षपदाचा निर्णयही लवकर घेण्यात येईल, असंही शरद पवार म्हणाले. यावेळी सभागृहातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची मागणी केली आहे.