मुंबई | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असल्याने जोरदार आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारचा पहिले अधिवेशन पार पडत आहे. दरम्यान अधिवेशन सुरू झाल्यापासून दोन्ही गटाकडून आरोप पत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. त्यासोबतच विधानभवनात पायऱ्यांवर दिल्या जाणाऱ्या घोषणा हा देखील यंदा चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान आज सत्ताधाऱ्यांनी थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना थेट आव्हान दिले आहे.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले कि, आमदारांची आपल्याला कीव येते, असे आदित्य ठाकरे विधानभवनात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले आहेत. गळ्यात पोस्टर लावून त्यांना कसे उभे केले आहे हे अख्खा महाराष्ट्र पाहत आहे. एका मंत्रीपदासाठी या गद्दार सरकारमध्ये किती काय करायला लागते. मला खरोखर यांची कीव येते. यांच्यावर घरात चांगले संस्कार झाले असते, तर आधी गद्दारी केली नसती आणि असे बिचाऱ्यासारखे उभे राहिले नसते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
याचबरोबर आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन थेट निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. ते म्हणाले कि, 40 लोकांनी राजीनामा द्यावा, मीही देईन. आपण निवडणूका लढवू. मी तर म्हणतो की विधानसभा बरखास्त करा, संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका लावा. होऊन जाऊ दे एकदाचं, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिले. ज्याची भिती वाटते, त्याच्यावर टीका जास्त केली जाते. पायऱ्यांवर उभे असणाऱ्यांची कीव येते. त्यांना खरी अपेक्षा होती मंत्रीपदांची. ती मिळाली नाही, म्हणून त्यांना श्रेष्ठींना खुश करण्यासाठी माझ्याविरोधात बोलायला लागत आहे.
गळ्यात काय काय घालून उभं केले जात आहे. ही निदर्शने करताना त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत आहे. चेहऱ्यावर भिती दिसत आहे. महाराष्ट्रात गद्दारी पटलेली नाही हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. चांगल्या प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून हे गेले आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.