पुणे | पुण्यातील सदाशिव पेठेत काल (मंगळवारी) एक धक्कादायक घटना घडली. सकाळच्या सुमारास एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर देखील व्हायरल होत आहे. यावेळी तरुणीच्या बचावासाठी पुढे आलेला लेशपाल जवळगे या विद्यार्थ्यांमुळे ती तरुणी थोडक्यात बचावली आहे. या हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेनंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध नोंदवत प्रतिक्रिया दिली आहे.
असे अनेक नेतेमंडळी आहेत ज्यांनी या दुर्दैवी घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी ज्या मुलांनी त्या तरुणीला वाचवले त्यांना प्रत्येकी ५१००० हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. या मुलांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
तरुणीचे प्राण वाचवणारा धाडसी तरुण काय म्हणाला?
मला एक मुलगी धावताना दिसली. वाचवा वाचवा, असे म्हणत ती धावत होती. मागून एक मुलगा हातात कोयता घेऊन धावत होता. हा सगळा प्रकार बघून लोक बाजूला होत होते. मला ती माझ्या बहिणीसारखी वाटली. मी मागचा पुढचा विचार न करता पुढे झालो. तो मुलगा वार करण्याच्या प्रयत्नात असताना मी त्याचा कोयता पकडला. इतक्यात एक मुलगा आला. त्याने त्याला मागून पकडले. एका मुलीचा जीव वाचवू शकलो, याचे समाधान आहे, असं लेशपाल जवळगे या धाडसी तरुणाने सांगितले.
नेमकं घडलं काय?
शंतनू लक्ष्मण जाधव असे हल्लेखोराचे नाव आहे. या घटनेत २१ वर्षीय तरुणी थोडक्यात बचावली असून, किरकोळ जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी टिळक रोडवरील एका इन्स्टिट्यूटमध्ये इंटेरियर डिझायनरच्या प्रथम वर्षात शिक्षण घेते. कोथरूडमधील महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असताना तिचा शंतनूशी परिचय झाला होता. मैत्री आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, शंतनू किरकोळ कारणावरून तरुणीला शिवीगाळ करून मारहाण करीत असे. त्यामुळे तरुणीने डिसेंबर २०२२ मध्ये त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडले. त्यानंतरही तो तरुणीला फोन करून धमकावत होता. त्यामुळे तिने त्याला ब्लॉक केले होते. मंगळवारी सकाळी तरुणी सदाशिव पेठेत आल्यानंतर शंतनूने तिच्यासह तिच्यासोबत असलेल्या मित्राला लक्ष्य केले व भररस्त्यात कोयता काढून तो तिच्या अंगावर धावून गेला. यावेळी तेथील लेशपाल या तरुणाने माथेफिरूचा हात पकडला आणि त्याला रोखले. त्यानंतर आसपासचे इतर तरुणही पुढे आले. त्यांनी माथेफिरू हल्लेखोराला रोखले आणि बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.