गडकरींची संजय काकडेंना शाबासकीची थाप!
संजय काकडेंच्या ६० हजारांहून अधिक ‘मोदी@9’ पुस्तिका वाटपाचे गडकरींनी केले कौतुक
पुणे | “देशातील पहिला आणि एकमेव असा खासदार आहे जो इतक्या मोठ्या संख्येने पुस्तिका छापून मोदी सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवतोय. लोकांकडे स्वतः जाऊन ती पुस्तिका त्यांना देतोय,” अशा शब्दांत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माजी खासदार संजय काकडे यांच्या ‘मोदी@9’ पुस्तिका वाटपाच्या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना शाबासकीची थाप दिली आहे.
भाजपाचे नेते व माजी खासदार संजय काकडे गेली पाच दिवस सलग ‘मोदी@9’ ही पुस्तिका पुणे लोकसभा मतदार संघात वाटत आहेत. मोदी सरकारच्या गेल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या महत्वपूर्ण योजनांची माहिती असलेली ही पुस्तिका आहे. काकडेंनी ६० हजारांहून अधिक पुस्तिका छापल्या आहेत. आणि ते स्वतः त्यांच्या कार्यकर्त्यांसह या पुस्तिकेचे वाटप करीत आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रविवारी २५ जून रोजी उद्घाटन होऊन या जनसंपर्क मोहिमेस प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ, त्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा पेठ, पर्वती विधानसभा मतदार संघात या पुस्तिकेचे वाटप संजय काकडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समवेत जाऊन केले आहे. आज पाचव्या दिवशी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात ही पुस्तिका नागरिकांना दिली जात आहे. गेली पाच दिवस पुणे शहरात पाऊस पडत आहे. पाऊस पडत असताना देखील संजय काकडे यांनी पुस्तिका नागरिकांना भेट देण्याची मोहिम थांबवली नाही. अनेकदा पावसात भिजत ते पुस्तिका वाटत फिरताना दिसत आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमानिमित्त आज पुणे शहरात आले असताना संजय काकडे यांनी त्यांची जेडब्ल्यु मेरिएट हॉटेलमध्ये भेट घेतली व त्यांना मोदी@9 ही पुस्तिका भेट दिली. शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातच हे हॉटेल असल्यामुळे संजय काकडे केंद्रीय मंत्री गडकरींना भेटले आणि गेली पाच दिवस सुरु असलेल्या या उपक्रमाची त्यांनी गडकरी यांना माहिती दिली.
दरम्यान, पुणे लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात ही पुस्तिका प्रत्येकी १० हजार प्रमाणे वाटण्यात येत आहे. त्या त्या विधानसभा मतदार संघातील २५ ते ३० कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या समवेत काकडे स्वतः या पुस्तिकेचं वाटप करीत आहेत.