मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे खिळखिळ्या झालेल्या शिवसेना पक्षाचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी आणि नव्याने भरारी घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे. मातोश्रीवर शुक्रवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. यावेळी झालेल्या पत्रकारपरिषदेत संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी याबबातची सविस्तर माहिती दिली. संभाजी ब्रिगेडने आजवर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांनी घेऊन एकत्र लढण्याचे धोरण अवलंबले आहे. आमची सातत्याने हीच भूमिका राहिली आहे.
आतादेखील महाराष्ट्राचे हित जोपासण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने एकत्र वाटचाल करण्याचे ठरवले आहे. या देशात क्रांतीची गरज आहे. लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. त्यामुळे पुरोगामी संघटनांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड भविष्यात सर्व निवडणुका एकत्र लढवेल, असे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , शिवसेना नेते सुभाष देसाई, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वीच नांदेड उत्तरमध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. यामध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. बालाजी पेनूरकर, जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम, तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड, शहराध्यक्ष शुभम पाटील नादरे, तालुका सचिव ओम पाटील ढगे, शहर उपाध्यक्ष नागेश पाटील मोरे, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष अजय देणे, जिल्हा सचिव संतोष पाटील नादरे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष कैलास पाटील जोगदंड, तालुका संपर्कप्रमुख गोपाळ पाटील कदम, नायगावचे तालुकाध्यक्ष मारोती पाटील का होले, विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी माधव दाळपसे यांचा समावेश होता.