मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील आदित्य ठाकरे यांचा भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करणारे भाजप आमदार नितेश राणे यांना शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे रात्रीच पत्र लिहतात की काय, हे मला समजत नाही. कारण मला एक प्रश्न पडतो की, आतापर्यंत तुम्ही ज्यांना भ्रष्ट म्हणत होतात, त्या सर्वांनाच तुम्ही सोबत घेतले. त्याचं पहिले काय करणार, याचे उत्तर प्रथम द्यावे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. त्या शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
यावेळी किशोरी पेडणेकर यांनी नितेश राणे आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला. सगळ्या बाजूंनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात रान पेटवले जात आहे. मात्र, मी तुम्हाला आज सांगते, की मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे हेच जिंकणार आहेत. तुम्ही अनेक पक्ष फिरुन येणार आणि नंतर ज्या पक्षात राहणार त्यांच्यासाठी गळे काढणार, असा टोला पेडणेकर यांनी राणे कुटुंबीयांना लगावला.
आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. टार्गेट करणारे दुसरे आहेत. पण आमच्याच काट्याने काटा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची असेल तर त्यांनी खुशाल करावी. पण हे विसरू नये की, २५ मधील २० वर्ष ते आमच्या सोबतच होते. स्थायी समितीमध्ये भ्रष्टाचार होतो, असं ते म्हणतात मग यशवंत जाधवांना सोबत का घेतले, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला.