पुणे | राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तानाजी सावंत हे आज सायंकाळपासून २ दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत मात्र तानाजी सावंत यांचा पुणे दौरा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तानाजी सावंत यांच्या पुणे दौऱ्यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. तानाजी सावंत यांच्या पुणे दौऱ्यात एकही सरकारी कार्यक्रम नसल्याने सावंत विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.
“किती कामाचा दौरा आहे पहा, महाराष्ट्राचे वाटोळे करणारे हेच अडाणी लोक. घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी तानाजी सावंत यांना लगावला आहे. तानाजी सावंत यांच्या दौऱ्यानुसार आज सायंकाळी साडे पाच वाजता आपल्या कात्रजच्या निवासस्थानी पोहचणार आहेत. तर उद्या सकाळी ११ वाजता ते कात्रज निवासस्थानाहून निघून बालाजी नगर येथील कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत. तर ३ ते ५ या वेळेत बालाजी नगर येथील कार्यालयातून निघून कात्रज येथील कार्यलयात असणार आहेत. ५ ते ८ या वेळेत पुन्हा कात्रज कार्यालय ते बालाजी नगर कार्यलय असा दौरा तानाजी सावंत यांचा प्रवास असेल. रात्री ८ वाजता बालाजी नगर कार्यालयातून निघून आपल्या कात्रज येथील निवासस्थानी जाणार आहेत. रविवारी देखील तानाजी सावंत यांचा असाच दौरा असणार आहे.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुणे शहरात येत असल्याने पुण्यासाठी काहीतरी भरीव काम करणार असल्याच्या अपेक्षा पुणेकरांनी ठेवणे यात गैर काहीच नाही. मात्र मंत्री महोदय यांचा दौरा हा घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर इतकाच असल्याने पुणेकर संताप व्यक्त करत आहेत.
पुणे शहरातील कोरोना रूग्ण संख्येचा आलेख झपाट्याने खाली येत असतानाच सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, अतिसार हे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिकेची रूग्णालये, दवाखाने, खासगी रूग्णालये, क्लिनिकमध्ये रूग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अशात सरकारमधील एक जबादारी मंत्री म्हणून याचा निदान आढावा तरी तानाजी सावंत घेतील अशी अशा होती. मात्र सगळं ‘पालथ्या घड्यावर पाणीच’ अशी म्हणण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे.