लोकसभा निवडणुकीचा आता फक्त एक टप्पा बाकी आहे..सात पैकी सहा टप्प्यात मतदान पार पडलं आहे.सहाव्या आणि सातव्या टप्प्यात एकूण ११५ जागा आहेत.गेल्या वेळी भाजपने यापैकी ५९ जागांवर विजय मिळवला होता. यापैकी २३ जागा पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली या प्रदेशांतील होत्या.दिल्ली आणि हरियाणात तर भाजपने दणदणीत विजय मिळवला होता.पण आता यावेळचं चित्र काय सांगतं. याचाच आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत..
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने हरियाणात इतिहास रचला. हरियाणातील लोकसभेच्या एकूण १० जागांपैकी सर्वच्या सर्व जागांवर भाजपला विजय मिळवता आला होत पण यावेळी हरियाणात पुन्हा क्लीन स्वीप करण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही, असं दिसून येतं..कारण भाजपने सहा जागांवर उमेदवार बदलले आहेत. रोहतक, हिस्सार, सिरसा आणि कुरुक्षेत्र या जागांवर भाजपला काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या आव्हानाचा सामना करावा लागला आहे. कुरुक्षेत्रमध्ये ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशीलकुमार गुप्ता विरुद्ध भाजपचे नवीन जिंदाल अशी लढत झाली गेल्या वेळी नायब सैनी यांनी इथून विजय मिळवला होता. सध्या तेच विद्यमान मुख्यमंत्री आहेत. रोहतक, हिस्सार, सिरसा इथंही भाजपसाठी सोपी लढत राहिलेली नाही. यातील सिरसा मतदार संघात काँग्रेसच्या कुमारी सैलजा यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे.तर गुरुग्राम, कर्नाल आणि फरिदाबाद या तीन ठिकाणी भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. गुरुग्राममध्ये काँग्रेसने राज बब्बर यांना तिकीट दिले आहे. भाजपचे राव इंद्रजित सिंह यांचा विजय त्यामुळे पक्का मानला जात आहे. कर्नालमध्ये माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचाही विजय सुकर बनला आहे. फरिदाबादमध्ये भाजपला विजयासाठी फारशी अडचण दिसत नाही. सोनिपत आणि भिवानी-महेंद्रगड या मतदारसंघात मात्र भाजपला काँग्रेसनं जोरदार आव्हान दिलं आहे. त्यामुळे भाजपला २०१९ प्रमाणे यावेळी सर्व दहा जागांवर विजय मिळवणं कठीण बनल्याचं चित्र दिसून येत आहे.
आता दिल्लीकडे वळूयात… राजधानी दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत…२०१४ प्रमाणे २०१९ मध्येही भाजपने सात ही जागांवर दणदणीत विजय मिळवला.. २०१९ मध्ये आप आणि काँग्रेसची युती न झाल्याने दोन्ही पक्षांना मोठा फटका बसला होता…आता मात्र सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे…गेल्या पंचवीस वर्षांपासून दिल्लीत जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकतो, त्याच पक्षाचं सरकार केंद्रात स्थापन होतं,असं समीकरण बनलं आहे. २००४ मध्ये काँग्रेसने सहा जागा जिंकल्या व केंद्रात सरकार स्थापन केलं होतं. नंतर असाच प्रकार भाजपच्या बाबतीत दिसून आला.पण यावेळी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांची युती आहे…त्यांच्या युतीचं आव्हान भाजपसमोर उभं ठाकलं आहे. मात्र, या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत अजूनही परस्परांबद्दल अविश्वासाची भावना दिसून येत आहे. हा मुद्दा भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतो. आम आदमी पक्ष नवी दिल्ली, पूर्व दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि दक्षिण दिल्लीतून, तर काँग्रेस पक्ष चांदनी चौक, उत्तर पूर्व दिल्ली व उत्तर पश्चिम दिल्लीतून मैदानात उतरला आहे. आम आदमी पक्षासाठी ही निवडणुक म्हणजे अस्तित्वाची लढाई बनली आहे. त्यातच स्वाती मालिवाल कथित मारहाण प्रकरणामुळे अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमेला मोठा धक्का पोहोचल्याचं दिसून येतं. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून भाजपने सहा जागांवर नवे चेहरे दिले आहेत. त्याचा कितपत लाभ होणार याचं उत्तर चार जून ला मिळेलच…
पंजाबमध्ये भाजपचा फारसा प्रभाव कधीच नव्हता.शेतकरी आंदोलन आणि अकाली दलाशी युती तुटल्यामुळे भाजपला या राज्यात बॅकफूटवर जावं लागलं आहे.पण यावेळी भाजप सर्व तेरा जागा स्वबळावर लढवत आहे. यातील दोन उमेदवार अकाली दलातून आलेले, एक उमेदवार आम आदमी पक्षातून आलेला, तर चौघे काँगे्रसमधून आलेले आहेत. तिघे जण निवृत्त नोकरशहा आहेत. म्हणजेच भाजपचे स्वतःचे केवळ तीन उमेदवार आहेत. पंजाबमध्ये यावेळी आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दल, भाजप आणि काँग्रेस हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढत आहेत. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. इथं काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यातच खरी लढत आहे. गेल्या निवडणुकीत केवळ दोन जागांवर जिंकलेल्या अकाली दलाला यावेळी अस्तित्वासाठी लढावं लागत आहे.
आता बघुयात हिमाचल प्रदेश मधील स्थिती…हिमाचल प्रदेश, लोकसभेच्या केवळ चार जागा असलेलं राज्य आहे.भाजपला गेल्या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकांत हिमाचलमध्ये भरभरून यश मिळालं होतं. यावेळी पुन्हा एकदा भाजप तशाच विजयाची अपेक्षा बाळगून आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ,केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं हिमाचल प्रदेश हे होमग्राउंड आहे..सध्या इथं ३७ उमेदवार रिंगणात आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे हमीरपूरमधून पाचव्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार आणि उनाचे माजी आमदार सतपाल रायजादा उभा आहेत…येथील मंडी मतदार संघातील निवडणूक लक्षवेधी बनली आहे. या मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची पत्नी तथा काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा सिंह यांनी बाजी मारली होती. यावेळी त्यांचे चिरंजीव विक्रमादित्य सिंह मैदानात आहेत. लोकप्रिय अभिनेत्री कंगना राणावतला भाजपने त्यांच्या विरोधात मैदानात उतरवलं आहे…हिमाचल मधील चार ही हायप्रोफाईल लढती चुरशीच्या होणार आहेत… हमीरपूरमधून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना विजय मिळवणं कठीण जाणार नाही, असा अंदाज वर्तवला जातोय..पण सिमला आणि कांगडा या दोन मतदार संघात भाजपला काँग्रेसच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे यावेळी भाजप सर्व चारही जागा जिंकण्याच्या स्थितीत नाही, असं चित्र दिसून येतं.