मुंबई : शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते असून, या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. मात्र, यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कुणाचा दसरा मेळावा होणार? यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र कुणी कितीही संभ्रम निर्माण करु देत, शिवतीर्थावर आमचाच दसरा मेळावा होणार, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे.
“दसरा मेळावा कुणाचा होणार यावरुन कोणताही संभ्रम नाही. संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी तो खुशाल करावा. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार. राज्यातील तमाम शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला येण्याची तयारी सुरु केली आहे. महापालिकेची परवानगी हा तांत्रिक मांत्रिक भाग.. ते नंतर बघू, पण आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कावरच होणार”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. विश्व हिंदू परिषदेचे नेते उद्धव कदम यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
“हिंदुत्ववादी आणि मुस्लिम कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. साधारण पक्षप्रवेशासाठी सत्ताधारी पक्षाकडे रांग लागते, पण आज प्रथमच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसतंय. गद्दारीनंतर महाराष्ट्राची माती मर्दांना जन्म देते, गद्दारांना जन्म देत नाही, याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेत येत आहेत. आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून भाजपने जी आवई उठवली होती, त्या आवईला छेद देणारे आज पक्षप्रवेश झालेत. एक वेगळं चित्र महाराष्ट्रात निर्माण होत आहेत. हे चित्र देशासाठी मार्गदर्शक ठरेल”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“खोट्या आणि भ्रामक हिंदुत्वाच्या नावाखाली आपली फसवणूक झाली, असं ज्यांना वाटतं… खरं हिंदुत्व शिवसेनेचं आहे असं ज्यांना वाटतं, त्यांना शिवसेनेचे तसेच मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व बळकट करण्यासाठी आपण आमच्या साथीला यावं”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.