लोकसभा अध्यक्षपदासाठी विरोधक आणि सत्ताधारी पक्षामध्ये सुरुवातीला घमासान बघायला मिळाल्यानंतर आता विरोधकांनी लोकसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी आपली दावेदारी सांगायला सुरुवात केली आहे. लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधी गटाकडे असण्याची परंपरा आहे. आणि यावरुनच सत्ताधारी पक्षाकडून देशाचे संरक्षणमंत्री भाजप नेते राजनाथ सिंह आणि विरोधीपक्षाकडून तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. समोर आलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य खासदार अवधेश प्रसाद यांना डेप्युटी स्पीकर अर्थात उपाध्यक्ष पद देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यांनी यावेळी अयोध्येतून लोकसभेची निवडणूक जिंकली आहे आणि ते दलित समुदायातून येतात. पण अवधेश प्रसाद यांना उपाध्यक्ष करणं भाजपसाठी अवघड असल्याचं बोललं जातंय. समाजवादी पक्षाने अयोध्येत विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांनी एक बिगर काँग्रेसी उमेदवाराचं नाव पुढे केलं आहे. याच पार्श्वभूमीवर अवधेश प्रसाद यांच्याच नावाची शिफारस का करण्यात आली आहे? या पदाला इतकं महत्व का? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात.
दलित समाजातून आलेल्या अवधेश प्रसाद यांना पुढे करून विरोधक सरकारवर दबाव टाकण्याच्या तयारीत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, अवधेश प्रसाद यांना उपसभापतीपदाचा उमेदवार बनवण्यासाठी समाजवादी पक्ष, काँग्रेस, आप आणि टीएमसीसह सर्व विरोधी पक्षांमध्ये एकमत झालं आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचं नाव उमेदवार म्हणून पुढे केलं जाणार आहे. अवधेश प्रसाद यांना उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करणं हा विरोधकांचा ‘मास्टरप्लॅन’ मानला जातोय. त्यांचं नाव पुढे करून विरोधकांना दलित समाजाला विशेष संदेश द्यायचा आहे. १९९० ते २०१४ पर्यंत लोकसभेचं उपाध्यक्षपदही सत्तापक्षाकडे होतं. २०१९ ते २०२४ पर्यंत उपाध्यक्षपदावर कुणाचीही निवड करण्यात आलेली नव्हती.पण यावेळी डेप्युटी स्पीकर हे पद भरलं जाणार आहे. अवधेश प्रसाद विजयी झाल्यापासून विरोधकांचे आवडते बनले आहेत. त्याची झलक संसदेतही पाहायला मिळाली. सपाचे प्रमुख अखिलेश यादव त्यांना सोबत घेऊन लोकसभेत पोहोचले होते. तर सभागृहातही ते अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यासोबत पहिल्या रांगेत बसलेले दिसले. अवधेश प्रसाद यांची सपाच्या दिग्गज नेत्यांमध्ये गणना केली जाते, ते मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातून ९व्यांदा आमदार झाले होते. पण नुकतंच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अवधेश प्रसाद यांचा विजय झाल्यानंतर त्यांचं राजकीय वजन आणखी वाढलं. याचं कारण म्हणजे त्यांचा अयोध्या मतदारसंघातून झालेला विजय. राम मंदिरामुळे भाजपने ही जागा सुरक्षित मानली होती, मात्र निकाल आल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी भाजपचे दोन वेळचे खासदार लल्लू सिंह यांचा ५४ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. त्यामुळे अवधेश प्रसाद यांच्या नावाचा विरोधकांनी विचार केला आहे.