देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर सात राज्यातील १३ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली. बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक झाली. सात राज्यात झालेल्या १३ विधानसभांवर १० जुलैला मतदान झालं होतं. १३ विधानसभेच्या या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीने दणदणीत विजय मिळवलाय. इंडिया आघाडीने एकूण १० जागांवर विजय मिळवला आहे तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे आणि भाजपाला मात्र मध्य प्रदेशच्या अमरवाडा आणि हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर या दोन जागांवरच समाधान मानाव लागलं. पश्चिम बंगालच्या रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि माणिकतला तर उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलोर तसेच पंजाबमधील जालंधर तर हिमाचल प्रदेश मध्ये पश्चिम देहरा, हमीरपूर आणि नालागड या विधानसभा जागांवर पोटनिवडणूक पार पडली. तर बिहारमध्ये रुपौली तसेच तामिळनाडूमध्ये विक्रवंडी आणि मध्य प्रदेशमधील अमरवाडा या ठिकाणी पोटनिवडणूका पार पडल्या.
पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनी रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि माणिकतला या चारही जागांवर विजय मिळवलाय. उत्तराखंडमध्ये देखील काँग्रेसने बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय काँग्रेसने उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ आणि मंगलोर या दोन्ही जागांवर विजय मिळवलाय. भाजपाला मंगळूरची जागा कधीही जिंकता आलेली नाही. ही जागा यापूर्वी काँग्रेस व बसपाकडे होती. बद्रीनाथमध्ये कॉंग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले आमदार राजेंद्र भंडारी आणि काँग्रेसचे लखपतसिंग बुटोला यांच्यात थेट लढत झाली तर काँग्रेसच्या लखपतसिंग बुटोला यांनी भाजपाच्या राजेंद्र भंडारी यांचा पराभव केला. पंजाब जालंधरमधून आम आदमी पार्टीने विजय मिळवला आहे. हिमाचल प्रदेश मध्ये नालागढ आणि देहरा या दोन जागांवर काँग्रेसने आपला झेंडा फडकवला आहे तर हिमाचल प्रदेशमधील हमीपुर मध्ये भाजपाचे आशिष वर्मा विजयी झाले आहेत. देहरामधून हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुक्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर ह्या विजयी झाल्या आहेत. नालागढ मधून हरदीप सिंह बावाने भाजपाच्या केएल ठाकूर यांचा ८९९० मतांनी पराभव केला. तामिळनाडूमधील विक्रवंडीची जागा द्रमुकचे आमदार ए पुघझेंडी यांचं ६ एप्रिल रोजी निधन झाल्यामुळे रिक्त झाली होती. त्यामुळे येथे पोटनिवडणूक झाली आहे. डीएमके विरुध्द भाजपाचे मित्र पक्ष पीएमके आणि एनटीके अशी तिरंगी लढत या ठिकाणी झाली. या तिरंगी लढतीमध्ये डीएमकेचे अन्निर सिवा हे विजयी झाले. मध्य प्रदेश मधील अमरवाडाची जागा भाजपाने जिंकली. बिहार मध्ये रुपौलीची जागा अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांनी जिंकली तर राष्ट्रीय जनता दलाच्या बीमा भारती ह्या तिसऱ्या नंबरवर राहिल्या. १३ जागांवर झालेल्या या पोटनिवडणुकीत फक्त २ जागांवरच भाजपाला समाधान मानावे लागले आहे. या पोटनिवडुकीत भाजपाला मोठा फटका बसल्याच पाहायला मिळतंय. हिमाचल प्रदेशच्या नालागढ मध्ये सर्वाधिक ७८.१ टक्के मतदान झालं तर सर्वात कमी मतदान हे उत्तराखंडच्या बद्रीनाथमध्ये ४७.६८ टक्के झालं होतं.