नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे सेनेमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत राजाभाऊ वाजे यांनी बाजी मारली होती. शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांची हॅटट्रिक वाजे यांच्यामुळे हुकली. दोन वेळा खासदारकी मिळविलेल्या हेमंत गोडसे यांचा तब्बल एक लाख साठ हजारांच्या फरकाने अतिशय मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला होता. हट्टाने घेतलेल्या उमेदवारीनंतर निर्माण झालेल्या नाराजीचा मोठा फटका गोडसे यांना बसला. दहा वर्षांत मतदारसंघात भरीव काम न झाल्याने मोठी नाराजी त्यांच्याबद्दल होती. मात्र, केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्राने उमेदवारीची घोषणा केल्यामुळे तिकिटासाठी अडून बसलेल्या गोडसेंना राजाभाऊ वाजे यांनी मोठ्या फरकाने पराभूत केले होते.
लोकसभा निवडणुकीदरम्यान राजाभाऊ वाजे यांना एका टीकेचा सामना करावा लागला होता ती म्हणजे ‘खेड्यातला माणसू इंग्रजी जमणार नाही’ आता त्याच टीकेला राजाभाऊ वाजेंनी फाड फाड इंग्रजी बोलून प्रत्युत्तर दिलं आहे. राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत आरोग्यविषयक प्रश्न मांडला. राजाभाऊ वाजे म्हणाले, हेल्थ पॉलिसींवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आलाय. कुंभमेळा माझ्या मतदारसंघात आयोजित केला जातो. नाशिक मेळा सर्वांत मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक विधी आहे. यामध्ये मोठा संख्येने साधू आणि साध्वी सहभागी होत असतात. युनेस्कोने कल्चरल हेरिटेजमध्ये याचा समावेश केला आहे. मात्र, नाशिकमधील रुग्णालयं अद्यावत नाहीत. शिवाय, इतर सुविधाही रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाहीत. कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भक्तांची संख्या पाहाता. सार्वजनिक आरोग्याचा विचार करुन सरकारकडून पाऊलं उचलण्याची गरज आहे. शिवाय ग्रामीण भागातील लोक अजूनही आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही राजाभाऊ वाजे यांनी केली. हा प्रश्न राजाभाऊ वाजे यांनी इंग्रजीत मांडला.