यंदाचा शिवसेना मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचं कारणही तसेच आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट तयार झाले आहेत. शिवसेना कुणाची हा निर्णय न्यायालयात प्रलबिंत आहे. मात्र न्यायालयाबाहेर शिवसेना कुणाची ही लढाई सुरुच आहे. दरवर्षीप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा होणार… पण तो नेमका कुणाच्या नेतृत्वात होणार…? हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आपलं मत व्यक्त केलेय. नारायण राणे यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचं सांगितलं आहे. तसेच यंदाचा दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात होणार असल्याचेही सांगितलेय.
महाराष्ट्रात ठाकरेंचा वारस म्हणजे शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही, बाळासाहेबांचं काय गुण आहेत? जे धडलं ते योग्य घडलं. मी पण बंड केलं होतं. बंड करण्यामागे खूप कारणं आहेत. ते करावं लागतं, जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही त्याला काय करणार ? खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे. दसरा मेळावा हा एकनाथ शिंदेचाच होणार, उद्धव ठाकरेंना विचार द्यायला काय आहे, त्याच्याकडे कोणते विचार आहेत? ते काय बोलणार? त्यामुळे एकनाथ शिंदे यांचाच मेळावा होणार असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रावरचं विघ्न दूर झालं आहे, गेली अडीच वर्ष महाराष्ट्रावर संकंट आलं होतं. पण आता ते नाहीय. हे सरकार चांगलं काम करत आहेत. एकनाथ शिंदेच्या मागे लागू नका ते एकदिवस सगळं काढतील. त्यांच्याकडे नगरविकास खातं होतं, त्यांना डिवचू नका सगळं आहे त्यांच्याकडे, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबतचा निर्णय मुंबई महापालिकेकडून होल्डवर ठेवला आहे. गणेशोत्सव आटोपल्यानंतरच निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण महापालिका सहाय्यक आयुक्त सपकाळे यांनी दिलं आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्कवरील परवानगीकरता जी नॉर्थ विभागाला दोन वेळा पत्र देऊनही महापालिकेने अर्ज अनिर्णीत ठेवला आहे. सध्या सर्व स्टाफ गणेशोत्सवाकरता आवश्यक प्रशासनिक बाबी आणि तयारीत गुंतल्यामुळे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही, असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.