मुंबई | राज ठाकरे यांची आज घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आहे.
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गणेशोत्सवानिमित्त एक आनंदाचं वातावरण आपण सगळीकडे पाहतो. त्यानिमित्ताने आपण एकमेकांच्या घरी जातो. राज ठाकरे यांची आपण केवळ सदिच्छा भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज ठाकरे यांचे ऑपरेशन झालं होतं, त्यावेळीच मी त्यांना भेटणार होतो. पण आता गणेशोत्सवानिमित्ताने त्यांची भेट घेतली. या दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. तसेच आगामी निवडणुकीच्या संदर्भात कोणत्याही समीकरणाची जुळवाजुळव करण्यात आली नाही.