अकोला | शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पुन्हा परतीचा प्रवास करायला लावण्यासंबंधीचा प्लॅन राष्ट्रवादीने आखल्याची चर्चा सुरु आहे. बंडखोरांसाठी राष्ट्रवादीचा नेमका प्लॅन काय आहे? या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना विचारले असता, आताच्या सरकारमधील अनेक लोक आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचं मिटकरी म्हणाले होते. मिटकरींच्या विधानावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीही पलटवार केला.
मिटकरींवर पलटवार करताना अब्दुल सत्तार यांनी खळबळजनक दावा केलाय. राष्ट्रवादीतून अनेक लोक आमच्याकडे येतात. अमोल मिटकरी सुद्धा आमच्या संपर्कात आहेत, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. सत्तार अकोला दौऱ्यावर होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.
सध्या राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांकडून आमदार अमोल मिटकरींवर अनेक आरोप होत आहेत. त्याची राज्यभर चर्चाही होत आहे. या संदर्भात सत्तार यांना विचारले असता, मिटकरींना एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे नेऊन तपासावं लागेल. डॉक्टरच सांगू शकतील, त्यांना नेमकी काय अडचण आहे असा खोचक उत्तर त्यांनी दिलं.
“अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषीखातं आहे. विशेषत: कृषिमंत्र्यांची नाळ शेतकऱ्यांना जोडलेली असते. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, एकदा पवार साहेबांची भेट घ्या. कृषी मंत्री असताना रात्रीचे झोपण्याचे इव्हेंट करण्यापेक्षा शेतकऱ्यांना काय ठोस मदत केली, हे पाहा. सोयाबीन, धान, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही तुम्ही मदत केली नाहीये. शेतकरी हवालदिल झालाय. तुम्ही जिथे जाताहेत तिथेचं शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे या सरकारच अपयश आहे. शेतकरी दुखावलेला आहे. या दौऱ्याला काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्याला ओला दुष्काळ जाहीर करून न्याय द्यावा, अन्यथा तुमच्या सिंहासनाला तडा जाईल”, अशी टीका अमोल मिटकरींनी सत्तारांवर केली होती.