पुणे | नितीन गडकरी शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील चांदणी चौकात ट्रॅफिकच्या समस्येने हैरान झालेल्या लोकांना दिलासा देण्याकरिता तेथील पूल पुढच्या दोन-चार दिवसांत जमीनदोस्त करु, असं गडकरींनी त्यावेळी सांगितलं. ट्रॅफिकच्या समस्येवर रामबाण उपाय म्हणून कधी हवेत उडणारी बस, कधी रोपवे कार, तर टोलनाक्यावरच्या गर्दीवर उपाय म्हणून टोलनाके कायमचे बंद, अशा घोषणा गडकरी वारंवार करतात. अशाच प्रकारच्या घोषणा त्यांनी यावेळी केल्या. याच घोषणांमुळे नितीन गडकरी सातत्याने सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये असतात.
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितिन गडकरी यांनी आपल्या मनातील विविध संकल्पना बोलून दाखवल्या. या संकल्पनांमध्ये पुन्हा हवेत उडणारी कार, रोपवे बस पाण्यापासून हायड्रोजन निर्मिती करण्याचा मानस गडकरींनी बोलून दाखवला. “पुणे शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी नितीन गडकरी यांनी उडत्या बसचा पर्याय दिला आहे. केंद्र सरकार निधी द्यायला तयार आहे, महापालिकेने तसा प्रस्ताव द्यावा”, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
“गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नितीन गडकरी यांच्या हस्ते सिंहगड पुलाचं उद्घाटन झालं होतं. या उद्घाटनपर भाषणात त्यांनी विकासकामांच्या अनुषंगाने मनातल्या इच्छा बोलून दाखवल्या होत्या. आता माझी एकच इच्छा आहे, मला पेट्रोल डिझेल बंद करायचंय आणि माझी ही इच्छा फक्त शेतकरीच पूर्ण शकतात, असा आशावाद गडकरींनी बोलून दाखवले होते.
नितीन गडकरींनी देशात पाण्यापासून हायड्रोजन निर्मिती करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. पेट्रोलपेक्षा खूपच कमी किमतीत हायड्रोजन उपलब्ध होऊ शकतो आणि त्याच माध्यमातून देशात फक्त कारच नव्हे तर ट्रेन आणि विमानसेवासुद्धा हायड्रोजनच्या सहाय्यातून सुरु करु शकतो, असं गडकरी म्हणाले होते.
टोल नाक्यांवरच्या गर्दीवर उपाययोजना म्हणून देशातील सगळे टोलनाके बंद करण्याची नितीन गडकरी यांची कल्पना आहे. टोल नाक्यांच्याजागी आधुनिक प्रणालीवर काम करणं सुरु असल्याचं गडकरींनी सांगितलं होतं. तसेच सॅटेलाईटच्या मदतीने गाडीची नंबर प्लेट स्कॅन करून आपोआप बँकेतून टोल आकारला जाईल, अशी गडकरींची संकल्पना आहे.