यूएईमध्ये येत्या 27 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. या चषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का लागलाय. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय. यामुळं आशिया चषकात राहुल द्रविडच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली जात आहे. तसेच या स्पर्धेत व्हीव्हीएस लक्ष्मणकडं संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. या स्पर्धेत भारतीय संघ त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 28 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यात राहुल द्रविडसह फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांना विश्रांती देण्यात आली होती आणि तिघेही दुबईत भारताच्या आशिया चषक संघात सहभागी होणार होते. या दौऱ्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत व्हीव्हीएस लक्ष्मणने प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. या मालिकेत भारतानं झिम्बाब्वेचा 3-0 नं विजय मिळवला. दरम्यान, आशिया चषकात भारत आपल्या मोहिमेची सुरुवात 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यानं करणार आहे. यासाठी भारतीय संघ यूएईला रवाना होण्यापूर्वी राहुल द्रविड यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय.
आशिया चषकाला येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात खेळला जाणार आहे. दरम्यान, सुपर 4 साठी 6 सामने खेळवले जाणार आहेत. सुपर फोरचा पहिला सामना 3 सप्टेंबरला शारजहामध्ये होणार आहे. तर त्याचा शेवटचा सामना 9 सप्टेंबरला म्हणजे फायनलच्या दोन दिवस आधी होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. सुपर फोरमधील पहिला सामना वगळता बाकीचे सर्व सामने दुबईत होणार आहेत.