नवी दिल्ली | टोकीयो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. नीरजच्या कामगिरीने भारताच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत पुन्हा धमाकेदार कामगिरी केली. लुसाने डायमंड लीगचे विजेतेपजद जिंकणारा नीरज पहिला भारतीय ठरला आहे.
७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ज्युरिख इथल्या डायमंड लीगमध्ये तो पोहचला आहे. हा विक्रम करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तो २०२३ मध्ये बुडापेस्ट, हंगेरी येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही उतरणार असल्याची माहिती मिळाली आहे.
नीरज चोप्रा दुखापतीमुळे बर्मिंगहम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकला नाही. त्यापूर्वी झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले होते. याच स्पर्धेदरम्यान नीरजच्या मांडीला दुखापत झाली होती. दुखापतीतून सावरल्यानंतर नीरजची ही पहिलीच स्पर्धा होती.
हरियाणातील पानिपत येथील रहिवासी असलेला नीरज चोप्रा डायमंड लीगचे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी, डिस्कस थ्रोअर विकास गौडा हा डायमंड लीगच्या पहिल्या तीनमध्ये प्रवेश करणारा एकमेव भारतीय आहे.