आयपीएल सुरू झाली की प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफ्सची नवीन गणितं तयार होतं असतात. अगदी आयपीएलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोणता संघ प्लेऑफ्समध्ये खेळणार हे फिक्स होत नसलं तरी जसजशी लीग स्टेज संपायला लागते तसतसं प्लेऑफ्सची गणितं क्लिअर होऊ लागतात. असंच एक प्लेऑफचं गणित सध्या बुधवारी झालेल्या सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनॉ सुपर जाएंट्सच्या सामन्यानंतर स्पष्ट झालंय. या सामन्यात हैदराबादनं लखनौचा मोठ्या फरकानं पराभव केला आणि याचा थेट फटका मुंबई इंडियन्सला बसल्याचं दिसतंय.
हैदराबाद आणि लखनौच्या सामन्यात लखनौनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 164 धावा केल्या होत्या. हैदराबादच्या सलामी जोडीनं अर्थात ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी नाबाद राहत हे लक्ष्य कवळ 58 चेंडूत पार केले. यावेळी ट्रेविस हेडनं 30 चेंडूत 89 तर अभिषेक शर्मानं 28 चेंडूत 75 धावा केल्या आणि लखनौला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादच्या या मोठ्या विजयानंतर मुंबई इंडियन्सचे प्लेऑफ्सपर्यंत पोहोचण्याचं आव्हान संपुष्टात आलंय. त्यामुळे या आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडणारा मुंबई हा पहिलाच संघ ठरलाय.
याचं नेमकं गणित काय आहे ते सुद्धा समजून घेऊ. लखनौविरुद्धच्या विजयानंतर हैदराबादला 2 गुण मिळाले. यामुळे त्यांचे एकुण गुण सध्या 14 असून ते गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. हैदराबादने हा सामना 10 विकेट्स आणि 62 चेंडू राखत जिंकला. त्यामुळे हैदराबादचा रन रेटही आता चांगलाच वाढलाय. त्यामुळे हैदराबादचा संघ हा 14 गुणांसह थेट तिसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहे आणि त्यांनी जवळपास प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. पण त्यामुळे मुंबई इंडियन्सचे सर्व गणित बिघडले आहे.
लखनौच्या संघाला या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे सध्या 12 गुण आहेत. पण आता लखनौचे अजून दोन सामने बाकी आहेत. यामध्ये लखनौ आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना सर्वात महत्वाचा असणार आहे. कारण या दोन्ही संघांचे समान 12 गुण आहेत. या सामन्यात कोणताही संघ जिंकला तर त्यांचे 14 गुण होतील किंवा हा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांचे 13 गुण होतील. दुसरीकडे मुंबईच्या संघाचे आता 8 गुण आहेत आणि त्यांचे फक्त दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे हे दोन्ही सामने जरी मुंबई इंडियन्सच्या संघाने जिंकले तरी त्यांचे 12 गुण होतील. विशेष म्हणजे लखनौ आणि दिल्ली वगळता सध्या पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या चैन्नई सुपर किंग्जचेही 12 गुण आहेत.याशिवाय चैन्नईचे आणखी 3 सामने बाकी आहेत अशा परिस्थितीत चेन्नईनं 3 पैकी किमान एक सामना जिंकल्यास चेन्नईचा संघ 14 गुणांसह मुंबईच्या पुढे जाताना दिसतो. त्यामुळे हैदराबादने लखनौवर विजय साकारल्यामुळे मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आल्याचं आता समोर आलंय.
मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली असली तरीही त्यांच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळाडूंच्या प्रदर्शनावर चाहत्यांची नजर असणार आहे. मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर आता त्यांचे खेळाडू आणखी आक्रमक खेळ करू शकतात. त्यामुळं त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या आणि उर्वरित इतर संघांची गणितं बिघडवण्याचं काम सध्या मुंबई करू शकते. मात्र, कितीही झालं तरी यंदाच्या आयपीएलच्या आधीपासून मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिकवर होत असलेली टीका पाहता या अपयशानंतर मुंबईचं मॅनेजमेंट हार्दिकच्या नेतृत्वाबाबत कोणता निर्णय घेणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. मात्र, हे सगळं होत असताना वर्ल्डकप फायनलनंतर ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडनं पुन्हा एकदा रोहितच्या चाहत्यांना खोल जखम दिली आहे. आणि आता ही जखम रोहित आर्मीला यंदाच्या टी20 विश्वचषकात भरून काढत ट्रेविस हेडचा पुरेपुर बदला घेण्याचीही संधी मिळणार आहे.