पुणे | उत्तरकाशी येथील द्रौपदीच्या दांडा-२ पर्वत शिखरावर मंगळवारी ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिमस्खलनात २९ गिर्यारोहक प्रशिक्षणार्थी अडकले आहेत आणि त्यांच्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश असल्याची बाब गिरिप्रेमी संस्थेद्वारे सांगण्यात आली आहे. उत्तराकाशीच्या आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राने जाहीर केलेल्या माहितीनुसार यामध्ये उत्तराखंडमधील नेहरू पर्वतारोहण संस्थेतील म्हणजे एनआयएम ॲडव्हान्स कोर्सचे २९ प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षकांचा समावेश आहे.
एनआयएमच्या ॲडव्हान्स कोर्सच्या प्रशिक्षणार्थी/प्रशिक्षकांची एक तुकडी गिर्यारोहणासाठी सुमारे ५ हजार फूट उंच द्रोपदीच्या दांडा-२ या शिखरावर झालेल्या हिमस्खलनात अडकले आहेत. या २९ पैकी ८ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर उर्वरित जणांचे शोधकार्य अद्याप सुरू आहे. याबाबत गिरिप्रेमी संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी सांगितले, ‘या हिमस्खलनाच्या घटनेमध्ये पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेची प्रशिक्षणार्थी आणि संस्थेच्याच एका महिला प्रशिक्षकाचे पती अडकल्याचे समजत आहे.
परंतु अद्याप आणखी किती जणांचा यात समावेश आहे याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. दरम्यान उत्तरकाशी येथे हवामानाची परिस्थिती देखील खराब असल्याने कोणत्याही प्रकारचे संपर्क होत नसून सातत्याने घटनास्थळाची माहिती गिरिप्रेमी संस्थेद्वारे घेतली जात आहे. तर प्रशिक्षणार्थ्यांची एक तुकडी ही बेस कॅम्पवर होती व त्यांना देखील तेथून त्वरित हलविण्यात आले आहे. हे प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक बेस कॅम्पवरून खाली येताच संपर्क होईल व या घटनेबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळू शकेल. तोपर्यंत परिस्थिती नेमकी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. तसेच तेथे मदतीसाठी लवकरात लवकर पोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’’ असे एनआयएमद्वारे सांगण्यात आले आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एनआयएमच्या पथकासह जिल्हा प्रशासन , एनडीआरएफ, एसडीआरएफ, सैन्यदल, आयटीबीपीचे पथक मदत व बचाव कार्यासाठी रवाना झाले असून अद्याप बचाव कार्य सुरू आहे. यासाठी हवाईदलाचे २ चित्ता हेलिकॉप्टर देखील मोहिमेसाठी तैनात करण्यात आले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या घटनेची दखल घेत आपल्या ट्विटरद्वारे सध्या होत असलेल्या बचाव कार्याची माहिती दिली.
हिमस्खलनाच्या घटनेमुळे सध्या एनआयएमद्वारे एक हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून ९९९७२५४८५४/७०६०७१७७१७ हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे.