पुणे | पुण्यातील कोथरूड परिसरात असलेली म्हातोबा टेकडी याठिकाणी नागरिक सर्रास येत असतात. परंतु निसर्गाच्या सानिध्यात आलेले हे नागरिक येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात कचरा करून जातात. मात्र गेल्या तीन वर्षांपूर्वी ओजस फाटक हा मुलगा या टेकडीवर आला होता. याठिकाणी त्याला कचरा दिसल्याने त्याने स्वतः हा कचरा वेचण्यास सुरुवात केली.
समाजात घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्यासंबंधी गंभीर बाब बनली आहे. त्यामुळे हवा, पाणी प्रदूषित होऊन मानवी अधिवासाला धोका निर्माण होत आहे. पर्यावरणाला हानीकारक ठरणारा हा घातक कचरा गोळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली तर काही प्रमाणात का होईना पर्यावरणीय समस्या कमी व्हायला मदत होईल, असा हेतू लहानग्या ओजसच्या मनात आला. म्हणूनच त्याने आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आजतागायत हा उपक्रम सुरू ठेवला आहे.
दरम्यान, यामध्ये काचेचे तुकडे, मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या, बाटली, खराब अन्न अशा विविध प्रकारचा कचरा या टेकडीवर पाहायला मिळतो पण हे शालेय विद्यार्थी आपल्या जीवाची पर्वा न करता येथील साफसफाई करतात. यामध्ये त्यांच्या कुटुंबियांचा देखील त्यांना पाठींबा मिळतो. ही मुले फक्त येथील कचरा उचलत नाही तर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावतात. तसेच कचऱ्याचे वर्गीकरण देखील करतात.
पर्यावरणाचे महत्त्व येथील शालेय विद्यार्थ्यांना कळाले पण आपल्याला मात्र अजूनही पर्यावरणाचे महत्व कळालेले नाही. त्यामुळे समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल, याकडे विशेष लक्ष देणे आता काळाजी गरज बनली आहे.